प्रा सचिन माथेफोड,पुणे
हवेली तालुक्यातील राजकारणात नेहमीच मोलाची भूमिका निभावणारे आळंदी म्हातोबा गाव आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी गावाचे आराध्य दैवत श्री म्हातोबा-जोगेश्वरी मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला गावातील प्रमुख पदाधिकारी, राजकीय पुढारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत पंचायत समितीसाठी सर्वसाधारण व जिल्हा परिषदेसाठी ओबीसी आरक्षण असल्याने “इतर गावांच्या उमेदवारांच्या पाठीमागे न उभे राहता आपल्या गावातीलच उमेदवार द्यावा” असा ठराव ग्रामस्थांनी एकमुखाने मंजूर केला.
यावेळी इच्छुक उमेदवारांची विचारणा करण्यात आली असता जिल्हा परिषदेसाठी सरपंच सोनाली तुषार जवळकर, ग्रा. सदस्य सायली तेजस शिवरकर, पूजा ऋषभ जवळकर यांची नावे पुढे आली. तर पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर व माजी सरपंच मोहन जवळकर यांची नावे चर्चेत आली.
सभेत बोलताना जालिंदर जवळकर, रवींद्र जवळकर, महेश गायकवाड, सुमित जवळकर, सचिन वाल्हेकर यांनी एकमुखाने ठराव घेतला की – “गावातील उमेदवार कोणताही असो, तिकीट मिळो वा न मिळो, माघार घेता कामा नये. ज्या पक्षाचे तिकीट मिळेल त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी.”
तेजस शिवरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “जर गाव माझ्या पाठीशी उभे असेल, तर आम्ही कोणत्याही पक्षाचे तिकीट घेऊन निवडणूक लढवू; मात्र माघार घेणार नाही.”
दिलीप वाल्हेकर म्हणाले, “मी हवेली तालुक्याचा प्रमुख आणि नियोजन समिती सदस्य असल्याने तिकीट वाटपात आपल्या गावाला प्राधान्य मिळेल. जर पक्षाने तिकीट दिले नाही तरी मी अपक्ष म्हणून मागील निवडणुकीत विजय मिळवलेला आहे, म्हणून या वेळीसुद्धा मागे हटणार नाही.”तसेच आळंदी म्हातोबा गाव हे नेहमीच एकी दर्शविते आता देखील सर्वांनी एकत्र येऊन साथ द्यावी आणि तालुक्याच्या पटलावर आपल्या गावाचे नाव अधोरेखित करावे.
गावातील ज्येष्ठ पुढारी अशोक जवळकर, भगवान जवळकर, दत्तात्रय जवळकर यांनी तरुण उमेदवारांना पूर्ण पाठिंबा जाहीर करताना सांगितले की, “गाव जो निर्णय घेईल, त्याला आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ.”
यावेळी माजी उपसरपंच श्रीहरी काळभोर, लक्ष्मण भोंडवे, सदस्य पारस वाल्हेकर यांनीही आपली मते मांडली.
या बैठकीसाठी गावातील तसेच परिसरातील विविध भागांतील राजकीय पुढारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात उत्साहाचे आणि स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चुरशीची निवडणूक रंगणार!
गण-गटातील अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरले असून, काहींनी दिवाळीपूर्व मिठाई वाटप, साड्या वाटप, देवदर्शन यात्रांचे आयोजन, पदाधिकाऱ्यांना पार्ट्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चुरस वाढली आहे.
गावोगावी “आमचाच उमेदवार हवा” अशी ग्रामस्थांची एकी दिसून येत असून, पक्षांचे तिकीट वाटप झाल्यानंतर खरी चुरस दिसेल. सर्वच उमेदवार तोडीस तोड असल्याने माघार कोण घेणार व कशी घेणार यावर या निवडणुकीचे राजकीय समीकरण ठरणार आहे.अनेक इच्छुक उमेदवार फॉर्म भरतील काही जण माघार देखील घेतील माघार घेण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या लढवतील परंतु मतदाराने जागृत राहून आपली भूमिका निभावावी.
















