प्रा एस एम सर
पूर्व हवेलीतील उमेदवारांची ‘स्वप्नसाखळी’ तुटली!
आरक्षणाच्या झटक्याने राजकीय समीकरणे उलटी – पंचायत समिती निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची एंट्री निश्चित
पूर्व हवेली तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेली उमेदवारांची स्वप्नयात्रा आता अचानक थांबली आहे. आरक्षण जाहीर होताच अनेकांच्या डोळ्यातील ‘भावी सदस्य’, ‘भावी सभापती’ या पदांच्या आशा क्षणात धुळीस मिळाल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर गाजत असलेले संभाव्य उमेदवार आता गप्प झाले आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर “भावी सभापती”, “जनतेचा नेता” अशा पोस्ट शेअर करणाऱ्या अनेकांच्या पोस्ट आता ‘मेमरी’मध्येच राहिल्या आहेत.
पूर्व हवेलीतील चार गणांपैकी तब्बल तीन गण महिलांसाठी आरक्षित झाल्याने पुरुष उमेदवारांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.थेऊर,आव्हाळवाडी, लोणी काळभोर, पेरणे, खेडे शिवापुर, कोरेगाव मुळ, सोरतापवाडी आदी भागात आता नव्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
आरक्षणाच्या या बदलामुळे अनेक अनुभवी व जुने उमेदवार मैदानाबाहेर फेकले गेले असून महिलांना राजकारणात नवा श्वास मिळणार आहे. त्यामुळे हवेलीतील या निवडणुकीत “महिला शक्तीचा दबदबा” दिसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आता नव्या चेहऱ्यांची नावे समोर येत असून, पूर्व हवेलीतील राजकारणात नवे चेहरे आणि नवे समीकरण पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे.
















