सचिन माथेफोड,पुणे
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित साक्षरतेची वारी
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोर येथे विसावलेला असताना सुप्रसिद्ध कीर्तनकार आदर्श शिक्षक गणेश महाराज भगत यांनी संत जनाबाईंच्या ‘”वाचील जो कोणी | जनी त्याची लोटांगणी” या अभंगावर वारकरी कीर्तन निरूपण सादर करून सर्व वारकऱ्यांना साक्षरतेचे महत्व प्रतिपादन केले . वारकरी संतांनी नेहमीच समाज सुशिक्षित व्हावा ,सजग व्हावा, ज्ञानाच्या माध्यमातून तो जागृत रहावा ,अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडून तो प्रगतीपथावर राहावा आणि आपल्या स्वहिताचा विचार करावा असा तळमळीचा आग्रह सर्व संतांनी धरला. आपल्या मराठी भाषेचा गौरव करून मातृभाषेतून सर्व तत्त्वज्ञान सोप्या भाषेत लोकांना कळेल अशा भूमिकेतून आपल्या ग्रंथांतून मांडून लोकांना साक्षर बनवण्याचा प्रयत्न बाराव्या शतकापासून संतांनी केला.
आपण वाचायला लिहायला शिकलोच नाही तर संतांची विचार आपल्यापर्यंत पोहोचतील कसे ?आणि ज्ञानेश्वरी गाथा भागवत यांसारखे पवित्र ग्रंथ आपल्याला समजतील तरी कसे? म्हणून साक्षर व्हा ,निरक्षर राहू नका ,नवभारत साक्षरता उपक्रमात सहभागी व्हा. ‘साक्षर भारत समृद्ध भारत‘ बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले. संतांच्या वारीतून साक्षरतेचा प्रचार हा संतांच्या विचारांचाच पुरस्कार या साक्षरतेच्या वारीतून केला जातो आहे असे मत त्यांनी मांडले.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण संचलनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून साक्षरतेची वारी या उपक्रमात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम याचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या या साक्षरता रथाचे आयोजन करून व भारत साक्षर भारत जनसाक्षर या उपक्रमातून साक्षरतेतून समृद्धीकडे हा मूळ मंत्र वारकऱ्यांपर्यंत रुजवण्याचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. या रथातून पूर्ण वेळ विविध गाणी,पथनाट्य,अभिनयातून प्रचार प्रसार करत या कार्य करणारे शिक्षक राजेंद्र जग्गे,अमोल पोकळे यांनी माहितीपत्रक व वारीचे अंतरंग या ग्रंथाचे वाटप वारकऱ्यांना केले.
साक्षरतेची वारी या महाराष्ट्र शासन अभिनव उपक्रमाचे संकल्पक आयुक्त सचींद्र प्रताप, संचालक राहुल रेखावार, संचालक डॉ. महेश पालकर संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य समन्वयक संभाजी देशमुख , राज्य समन्वयक भाऊसाहेब सरक , समन्वयक सीमा राणे यांच्या कुशल नेतृत्वाने शिक्षण रथाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातही रथाच्या माध्यमातून साक्षरतेची वारी प्रवाहित केली जात आहे. त्यातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य सुरू आहे आहे.वारकऱ्यातून या रथाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
















