थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ भाजप सरकारमुळेच प्रत्यक्षात येत आहेत, असे ठाम मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्रीक्षेत्र थेऊर येथे आयोजित प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी थेऊर जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार सौ. पुष्पलता प्रकाश सावंत, थेऊर–कुंजीरवाडी–आळंदी म्हातोबा पंचायत समिती गणाचे उमेदवार योगेश काकडे तसेच कोलवडी–मांजरी–आव्हाळवाडी गणाच्या उमेदवार सौ. पूनम अशोक गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद होते.
आमदार राहुल कुल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. हवेली तालुक्याची वाहतूक कोंडी कायमची सोडवणारे दोन महत्त्वाचे उड्डाणपूल प्रकल्प मंजूर झाले असून पुणे–सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलासाठी ५५० कोटी रुपये तर पुणे–नगर महामार्गावरील उन्नत पुलासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजुरीबरोबरच प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या दृष्टीने शासनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहराभोवतीचा रिंग रोड हा ऐतिहासिक प्रकल्प भाजप सरकारने मार्गी लावला असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देत प्रकल्प राबवला जात आहे. दोन ते अडीच वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार असून यामुळे हवेली तालुक्याचा विकास वेगाने होणार आहे.
ग्रामीण भाग थेट शहराशी जोडण्यासाठी मेट्रो प्रकल्प उरुळीकांचन पुढे यवतपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून नदी शुद्धीकरण, वाढते नागरीकरण आणि पायाभूत सुविधांसाठी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसाठीही भाजप सरकारने ठोस योजना आखल्या आहेत.
“जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले, तर विकासकामांमध्ये कोणतीही अडथळा राहणार नाही. हवेली तालुक्याचा सर्वांगीण आणि नियोजित विकास भाजप करू शकते,” असा ठाम विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, स्थानिक संस्थांचे पदाधिकारी तसेच हजारो नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















