प्रदीप खेसे,यवत :
यवत येथील बाजार परिसरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या बाजारातील जागांवर कब्जा करत मनमानी सुरू केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे रहदारी पूर्णपणे खोळंबली असून नागरिकांना जीव मुठीत धरून बाजारात ये-जा करावी लागत आहे.परप्रांतीय व्यापारी रस्त्यावरच हातगाड्या व दुकाने थाटून संपूर्ण जागा अडवत असून मराठी व्यापारी व स्थानिक शेतकऱ्यांना बाजारातून जाणीवपूर्वक हुसकावून लावण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांना माल विक्रीसाठी जागा न देणे, वाद घालणे व दडपशाही करणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मनमानी अतिक्रमणामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित पंचायत व पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यवतकर नागरिकांनी दिला आहे.



















