विनायक पाटील,उरुळी कांचन
उरुळी कांचन येथील डाळिंब परिसरातील भक्तिवेदांत गुरुकुल येथे ‘पालकत्वाची कला’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लहान मुलांचे संगोपन, पालकांची पाल्याप्रती असलेली जबाबदारी तसेच मुलांमध्ये व पालकांमध्ये संवाद कसा व कोणत्या पद्धतीने असावा, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात श्री. बालगोविंददास (B.Tech.) यांनी भागवतम् या ग्रंथावर आधारित मार्गदर्शन केले. लोणीकाळभोर, कुँजीरवाडी, नायगाव आदी परिसरातून आलेल्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
डाळिंब, उरुळी कांचन येथील भक्तिवेदांत गुरुकुलमध्ये सध्या सुमारे ५० विद्यार्थी अध्यात्मिक शिक्षणासह CBSE शालेय शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे येथे रशिया, अमेरिका, जम्मू-काश्मीर, चेन्नई, हैदराबाद आदी ठिकाणांहूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत.
सुमारे २ एकर परिसरात वसलेल्या या गुरुकुलमध्ये गिर गाईंचे गोपालन, कराटे प्रशिक्षण, मृदंग-करताल वादन, कीर्तन तसेच CBSE अभ्यासक्रमाचे सुसंस्कृत शिक्षण दिले जाते.
या शिबिराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शंकर गुप्ता (उद्योजक, नायगाव) म्हणाले,“या शिबिरातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. येथील वातावरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्तम आहे.”



















