डॉ.विनायक पाटील,उरुळी कांचन :
उरुळी कांचन येथून रेल्वे ब्रिजखालून दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील पुलाला अद्याप संरक्षण जाळी व कठडा नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. सदर पुलावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असून, थोडीशी चूक झाली तरी वाहन थेट ओढ्यात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात तसेच धुक्याच्या परिस्थितीत पुलावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण कठडा नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या मार्गावरून दररोज शेतकरी, कामगार, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. यापूर्वीही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीकडे तात्काळ संरक्षण जाळी व कठडा उभारण्याची मागणी केली आहे. अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कामे करावीत, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.



















