सचिन माथेफोड,पुणे
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी फाटा परिसरात आज सकाळी एका डिझेल टँकरला भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
टँकरमध्ये साठवलेला डिझेल जळाल्यामुळे काळा धूर आणि आगीचे मोठे लोट आकाशात झेपावत होते. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ रस्ता बंद करून वाहनांना वळवले.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट अथवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.



















