कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा
सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या ठिकाणी नवीन दुभाजक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंजीर लॉन्स परिसरात तसेच भारत बेंझ कंपनीसमोर हे दुभाजक उभारण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.अशी माहिती वाहतूक पोलिस अधिकारी राजेंद्र करणकोट यांनी दिली.गेल्या काही वर्षांत कुंजीरवाडी परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले होते. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
या कामासाठी स्थानिक आमदार माऊली कटके, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप वाल्हेकर,हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी,मनोज चौधरी,भाजप पदाधिकारी पूनम चौधरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती.नवीन दुभाजक उभारल्यानंतर वाहतुकीची दिशा स्पष्ट होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच गावातील कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर कुंजीरवाडी गाव अधिक सुरक्षित व रहदारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
















