सचिन माथेफोड
आळंदी म्हातोबा व कुंजीरवाडी या दोन्ही गावामधील शिवरस्त्यालगत असणाऱ्या मगर वस्ती मधील रहिवाशांना कदाचित आपल्या घरात घुसण्यासाठी बोट विकत घ्यावी लागणार आहे असे चित्र तयार झाले आहे.मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने रहिवाशांना आपल्या घराचा रस्ता देखील सापडत नसल्याने रहिवाशांनी आता घरात घुसण्यासाठी बोटी नाहीतर नावा विकत घ्याव्यात का असा प्रश्न निर्माण झाला आहे.काही घरांमध्ये पाणी साचलेले आहे तर काही घरे सध्या पाण्यामध्येच आहे.शिवरस्त्याच्या अपुऱ्या माहितीमुळे तसेच चुकीच्या पद्धतीने केलेल्या प्लॉटिंग मुळे व स्थानिक शेतकऱ्यांनी शेताचे बांद रुंदविल्यामुळे येथील पाणी बाहेर जाण्यास मार्ग नाही.स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे नकाशानुसार या ठिकाणी पाणी जाण्यासाठी नैसर्गिक ओघळ होती ती आता नाही.त्यामुळे ड्रेनेजचे पाणी सोडायचे कुठे हा मुख्य प्रश्न आहे.जिथे सांडपाणीच जायला जागा नाही तिथे पावसाचे पाणी कुठे सोडणार.तसेच चुकीच्या पद्धतीने केलेल्या प्लॉटिंगमुळे अनेक प्लॉट सध्या पाण्याखाली आहेत.अनेक दिवस पाणी साठून राहिल्याने रहिवाशांसमोर आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहे.शिवरस्ता नेमकं कुठे आहे आणि किती आहे याची योग्य माहिती नसल्याने याठिकाणी नवीन रस्ता देखील प्रशासनाच्या माध्यमातून सध्यातरी करता येत नसल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे.
अनधिकृत प्लॉट घेताना घ्या काळजी
पुण्यामध्ये नोकरी व्यवसायानिमित्ताने अनेक बाहेर गावाचे लोक येत आहेत अशावेळी पुण्यात स्वतःचे घर जागा असावी असा विचार करून पै पै साठवून लोक प्लॉटिंग मधे गुंठा घेतात परंतु जागा विकेपर्यंत जागेचे फसवे सुशोभीकरण करून जागा विकली जाते.त्यामुळे जागा घेताना रस्ता ,ड्रेनेज ,लाईट ,पाण्याची सुविधा या गोष्टींची खात्री करूनच व्यवहार करावा.
याबाबत महसूल विभागाशी संपर्क केला असता मंडलाधिकारी थेऊर यांनी सांगितले की सदरील जागेचा पंचनामा केला असून याचा रिपोर्ट तहसीलदार यांना पाठवणार आहोत.यामध्ये नैसर्गिक ओघळ बुजविण्यात आलेले असून स्थानिक शेतकऱ्यांनी बांध रुंदविलेले आहेत.
शेवटी एकी महत्वाची
सदरील रस्त्याचा व पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळत असून स्थानिक रहिवाशांच्यामध्ये एकीची भावना दिसत नसल्याने व या समस्येचा पाठपुरावा एकत्र येऊन करत नसल्याने सदरील प्रश्न चिघळत चाललेला आहे.स्थानिक नागरिक गिरीश शिवरकर सदरील परिस्थीबाबत वेळोवेळी आवाज उठवत असून स्थानिक नागरिकांनी देखील यात सहभागी होऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे.तसेच स्थानिक राजकीय लोकांनी देखील केवळ निवडणुकीपुरता व मतांपुरता विचार न करता एक जबाबदारी म्हणून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.काल कल्पना देऊन देखील एकही स्थानिक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित नव्हते यामुळे स्थानिक म्हणाले यांना आम्ही मतदान करावे का नाही.
















